अभिजित हेगशेट्ये यांना त्यांच्या “देवरुखच्या सावित्रीबाई” या हळबे मावशी यांच्या चरित्रात्मक ग्रंथासाठी राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष, मातृमंदिर देवरुख कार्याध्यक्ष, पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते, विचारवंत, साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार अभिजित हेगशेट्ये यांना त्यांच्या “देवरुखच्या सावित्रीबाई” या हळबे मावशी यांच्या चरित्रात्मक ग्रंथासाठी राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. थेरगाव (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत रेडेकर यांनी ही घोषणा केली.वाचनालयाच्या वतीने दरवर्षी राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार देऊन साहित्यिकांना गौरविण्यात येते. राज्यभरातून आलेल्या साहित्यकृती मधून काही निवडक कृतींना हा पुरस्कार दिला जातो. गेली १० वर्षे हा उपक्रम सुरू आहे. मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाते.यंदा हा पुरस्कार मातृमंदिरचे कार्याध्यक्ष, साहित्यिक अभिजीत हेगशेट्ये यांना जाहीर झाला आहे. श्री. हेगशेट्ये यांच्याबरोबर छाया कोरेगावकर, डॉ. जे. के. पवार, वनिता जांगळे, महादेव माने, शांताराम डफळ आदी मान्यवरांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.यापूर्वी हा पुरस्कार नवनाथ गोरे, छाया बेले, गोविंद काजरेकर, संपत मोरे, संभाजी बिरांजे, चंद्रशेखर कांबळे, शरद गायकवाड, बाळासाहेब भडकवाड, मनोहर सोनवणे आदींसह मान्यवर साहित्यिकांना प्राप्त झाला आहे.