
आचारसंहितेमुळे रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांची लवकरच नियुक्ती
पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक भरतीत १०१४ जणांची नियुक्ती झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे नियुक्तीची प्रक्रिया रखडली होती. मतदानानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून आठवडाभरात रिक्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांना कायमस्वरूपी प्राथमिक शिक्षक मिळणार आहेत.गतवर्षी ७००, तत्पूर्वी ३०० प्राथमिक शिक्षक परजिल्ह्यात गेले असून यंदा ३५० शिक्षक परजिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या एक हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असून त्यात नव्याने ३५० प्राथमिक शिक्षकांची भर पडणार आहे. १३५० प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त राहणार असून ती भरण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.मार्च महिन्यात १०६८ जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. १०१४ शिक्षक या प्रक्रियेला उपस्थित होते. नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. राज्य शासनाने त्याची दखल घेतल्याने १८० शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. लवकरच जिल्हा परिषदेच्या रिक्त प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.www.konkantoday.com