
रत्नागिरी शहर बस सेवेत महिला आणि जेष्ठ नागरिकांना प्रवास भाडे सवलत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे धन्यवाद
रत्नागिरी दि. २८ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ग्रामीण वाहतुकीच्या बस गाड्यांमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेली प्रवास भाड्याची सवलत आता रत्नागिरी शहरी वाहतुकीच्या बस गाड्यांमध्येही दिनांक 24 जून 2024 पासून शासनाने दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून रत्नागिरीतील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाडे सवलत उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे धन्यवाद देणारा ठराव कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी सभेत मंजूर करण्यात आला आहे. ही सवलत रत्नागिरी शहरी वाहतुकीमध्ये मिळावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन मुख्यमंत्र्यांनी ही सवलत रत्नागिरी बस वाहतुकीसाठी मंजूर केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध होऊन वडापच्या खर्चिक प्रवासापासून दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मुख्यमंत्री नामदार शिंदे तसेच पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना धन्यवाद देण्यात आले आहेत. संघाचे अध्यक्ष श्री मारुती अंबरे यांनी हा धन्यवाद देणारा ठराव दिनांक 26 जून रोजी झालेल्या संघाच्या कार्यकारिणीच्या सभेत एकमताने मंजूर केला.