विद्यार्थ्याला मारहाण करणार्या जि.प. तेर्ये शाळेच्या उपशिक्षिका निलंबित
जिल्हा परिषद तेर्ये शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्याला मारहाण करणार्या उपशिक्षिकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून शाळेतील विद्यार्थ्याला शाळेच्या उपशिक्षिका यांनी मारहाण केली होती. तसेच शाळेतील आणखी काही विद्यार्थ्यांच्या उपशिक्षिकेविरूद्ध तक्रारी होत्या. याबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, नाईक व केंद्रप्रमुख सावंत यांनी चौकशी केली होती. तसा अहवाल त्यांनी वरिष्ठ पातळीवर दिला होता. तसेच ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी जि.प. रत्नागिरी व मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे निवेदन देत या प्रकरणी सखोल चौकशी तसेच उपशिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पालक व ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारींची चौकशी करत जि.प. शिक्षण विभागाने या उपशिक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश दिले.www.konkantoday.com