
गुहागर पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण जाहीर
गुहागर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण आज (१३ ऑक्टोबर) निश्चित करण्यात आले. गुहागर पंचायत समिती सभागृह येथे ही आरक्षण सोडत पार पडली.
ही सोडत निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्या देखरेखीखाली तसेच गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नायब तहसीलदार महेंद्र सावर्डेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीमध्ये पाचेरी सडा पंचायत समिती गणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, शृंगारतळी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग, मळण पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, शीर पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, असगोली पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, अंजनवेल पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, कोंड कारूळ पंचायत समिती गण सर्वसाधारण अनारक्षित, पडवे पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, तळवली पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, वेळणेश्वर पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे.
अनेक पंचायत समिती गणांमध्येमध्ये महिला आरक्षण पडल्याने विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांचे पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न भंगले असल्याची चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे पंचायत समिती गण स्त्री राखीव पडल्याने इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच महिला उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
असगोली व अंजनवेल पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षांना महिलांची शोधाशोध करावी लागेल हे निश्चित आहे. तर काही ठिकाणी सदस्य पदांसाठी महिलांमध्ये चुरस निर्माण होईल अशी ही स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारण अनारक्षित पडलेल्या कोंड कारूळ, पडवे, तळवळी, वेळणेश्वर चारी गणांच्या जागांवर सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने या जागांवर अटीतटीची लढत होणार हे निश्चित असून आतापासूनच इच्छुक उमेदवार पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गुहागर पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी विविध पक्षातील माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक व पत्रकार बंधू उपस्थित होते. तहसीलदार परीक्षित पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्व नागरिकांच्या वतीने पत्रकार निसार खान यांनी या आरक्षण सोडत कार्यक्रमाचे गुहागर महसूल विभागाने योग्य नियोजन केल्याने आभार मानले.




