
*“Arju Techsol” या फसवणुकीच्या गुन्ह्यात अन्य एका आरोपीस “अटक”
दिनांक 23/05/2024 रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. 76/2024 भा.द.वि.सं. चे कलम 420, 406 सह महाराष्ट्र हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 अन्वये “Arju Techsol” कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या गुन्ह्यातील आरोपींमार्फत “Arju Techsol” कंपनी स्थापन करून “जॉब वर्क पध्दतीने काम घ्या. आम्हाला प्रोडक्ट तयार करून दया, जास्तीत जास्त उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना रोजगाराची सुवर्ण संधी” अशा स्वरुपाची जाहीरातीचे पांपलेट छापून वाटण्यात आले होते तसेच आरोपींनी फिर्यादी व गुंतवणुकदार यांना ₹25,000/- ते ₹40,00,000/- डिपॉजिटच्या 15 महिने, 36 महिने व 60 महिने या कंपनीच्या स्किम सांगुन कंपनीमध्ये डिपॉजिट ठेवलेल्या रक्कमेवर (Return of Income) म्हणून गुंतवणुकदारांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखविले तसेच गुंतवणूकदारांकडून वेगवेगळी घरघुती व किरकोळ उत्पादने बनविण्याकरिता वेगवेगळी रक्कम ठरवून डिपॉजिट घेण्यात आले व गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.या गुन्ह्यामध्ये, आरोपी 1) प्रसाद शशिकांत फडके, वय 34, वर्षे, रा.घर नं.72, ब्रााम्हणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी, ता.जि. रत्नागिरी यास दि. 28/05/2024 रोजी व 2) संजय गोविंद्र केळकर वय-49 वर्षे, रा. घर नं. 350, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी-हातखंबा ता.जि. रत्नागिरी यास दि. 26/05/2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे तसेच दोघांना दि. 03/05/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर झालेली होती. सध्या दोन्ही आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.सदर गुन्हयातील अन्य आरोपी संजय विश्वनाथ सावंत, वय 33, राहणार पुनस-सावंतवाडी, तालुका लांजा, याने आज दिनांक 26/06/2024 रोजी मा. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता परंतु मा. सत्र न्यायालयाने आरोपी संजय विश्वनाथ सावंत याचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे. पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे, आर्थिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ मा. सत्र न्यायालय येथे हजर राहून आरोपीची पोलीस कोठडीची मागणी केली. मा. सत्र न्यायालयाने आरोपी संजय विश्वनाथ सावंत यास दिनांक 29/06/2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.या गुन्हयाच्या तपासामध्ये आर्थिक गुन्हे शाखेमार्फत आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, औरंगाबाद व सातारा जिल्ह्यातील बळी पडलेल्या एकूण 525 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत तसेच फसवणूक झालेली रक्कम ₹5,92,69,866/- आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.“Arju Techsol” या कंपनीचे भाडे कराराने घेतलेले गोदाम, फॅक्टरी ऑउटलेट व त्यामधील कच्चा व तयार माल हा जप्त करण्यात आलेला आहे तसेच या जप्त मुद्देमालाच्या लिलावाकरीता मा. न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेमार्फत परवानगीची मागणी करण्यात आलेली आहे तसेच या कंपनीच्या बॅक खात्यातून झालेल्या सर्व आर्थिक व्यवहाराचे मान्यताप्राप्त लेखपरीक्षकांकडून लेखापरिक्षण करण्यात येणार आहे व त्याकरिता लागणाऱ्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.www.konkantoday.com