सावंतवाडी भंडारी मंडळाचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा
सावंतवाडी, दि. २३ (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सावंतवाडी भंडारी मंडळाने भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच निरंजन डावखरेंच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे जाहीर केले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज हा मोठ्या प्रमाणावर असून, सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही समाजाचा मोठा सहभाग असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेल्या सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार निरंजन डावखरे यांना पत्रकाद्वारे पाठिंबा जाहीर केला. तसेच भंडारी ज्ञातीतील मतदार महायुतीच्या बाजूने मतदान होण्यासाठी सक्रिय कार्य सुरू केले असल्याचे नमूद केले. मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, कार्याध्यक्ष दिलीप गोडकर, सचिव दिलीप पेडणेकर, उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, दत्तप्रसाद अरविंदेकर, देविदास आडारकर, शांताराम आकेरकर, सहसचिव नामदेव साटेलकर, खजिनदार चंद्रकांत वाडकर यांच्या समितीने आमदार डावखरे यांना पाठिंबा देण्याचे पत्र प्रदान केले.