बेकायदेशीर एलईडीवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा निलेश राणे यांचा इशारा
पावसाळ्यातील बंदी काळातही येथील समुद्रात मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी सुरू असतानही त्याकडे सहाय्यक मत्स्य आयुक्त विभागाची डोळेझाक झाली आहे. ही मच्छिमारी कायद्याच्या चौकटीत येत नसून तरीही या विभागाकडून त्याला खतपाणी घातले जात आहे. त्यासाठी या विभागाला कारवाईच्या योग्य त्या सूचना जिल्हा प्रशासनाने कराव्यात, अन्यथा आमच्या पक्षीय स्तरावर सहाय्यक मत्स्य आयुक्त विभागावर आंदोलन करण्याची सक्त ताकीद माजी खासदार तथा भाजपचे नेते निलेश राणे यांनी दिली आहे.जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी प्रशासनातील अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेत चर्चाही केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते. सध्या पावसाळ्यामुळे यांत्रिक मच्छिमारी बंदी काळ आहे. अशा काळातही एलईडी मच्छिमारी येथील समुद्रात होत असल्याकडे राणे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या मच्छिमारीला कायद्याची कोणतीही परवानगी नाही. तरीही एलईडी मच्छिमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर येथील सहाय्यक मत्सय आयुक्तांचे कोणतेही लक्ष नसल्याचे त्यांनी सांगितले.गुहागर-विजापूर महामार्गाच्या मोबदल्याचा प्रलंबित विषय जिल्हा प्रशासनासमोर पुन्हा निलेश राणे यांनी उपस्थित केला. या मोबदल्याच्याविषयी मागील काळात आंदोलन करण्यात आले होते. पण दिलेल्या आश्वासनामुळे ते आंदोलन स्थगित ठेवण्यात आले होते. म्हणून आता हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी राणे यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केली. www.konkantoday.com