
दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये 13 आणि 14 जून रोजी ताशी 45 ते 55 किमीपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
आगामी काही दिवस हवामान खात्याने मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर, कोकण परिसरामध्येही सारखीच परिस्थिती असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बुधवारी (11 जून) मुंबई आणि उपनगरात हवामान ढगाळ आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच, या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ठाण्यासह कोकणात शुक्रवार 12 जूनपासून ते 17 जूनपर्यंत मुसळधार वादळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये नदीकाठच्या गावांना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहण्याचाही धोका हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच नद्यांना पूर येऊन नागरी जीवनही विस्कळीत होऊ शकते, असा इशारा दिला आहे. घाटरस्त्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे दृश्यमान्यताही कमी होऊ शकते. तसेच मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचाही धोकाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुंबईसह ठाण्यामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये 13 आणि 14 जून रोजी ताशी 45 ते 55 किमीपर्यंत वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे वादळी पावसापासून सावध रहावे, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. किनाऱ्यालगतच्या गावांना धोका असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदा मान्सून 26 मे रोजी कोकणात दाखल झाला. भारतीय हवामान खात्याने 2025 च्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा 106 टक्के जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.