रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांतर्फे जागतिक योग दिन उत्साहात
रत्नागिरी (वा.) : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव वाढला असून त्यावर मात करून निरामय आरोग्यासाठी योग हा गुरु मंत्र ठरला आहे. त्यामुळे योगाचे हे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन ज्येष्ठ आणि युवा पिढीने योगाभ्यास करावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी रत्नागिरी येथील प्राचीन श्री राम मंदिरात जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग मार्गदर्शन शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी केले. श्री अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांना योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानिमित्ताने आयोजित जागतिक योग दिन कार्यक्रमात सौ. घोसाळकर यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी योग्य प्रशिक्षक श्रीमती स्मिता साळवी, वैशाली झोपे शालिनी केतकर डाफळे, विवेक जोशी हे उपस्थित होते. हे प्रशिक्षक योगाचे नियमित उत्तम प्रशिक्षण देत असल्याबद्दल त्यांनी त्यांना धन्यवाद देऊन ज्येष्ठांसाठी हा उपक्रम नियमित सुरू ठेवावा, असे प्रतिपादन केले. त्यासाठी श्रीराम मंदिराकडून सर्व सहकार्य दिले जाईल असे त्यांनी सांगितलेश्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे सचिव समाज भूषण सुरेंद्र घुडे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. तसेच घोसाळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉक्टर दिलीप पाखरे, संयोजक श्री. सुरेश लिमये, संतोष रेडीज, विनायक हातखंबकर श्री. सुर्वे यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी आयोजित योगा प्रात्यक्षिकांमध्ये नंदकुमार बिर्जे, रमाकांत पांचाळ, अपर्णा कोचरेकर, प्रतिभा गावडे, स्नेहल कुंभवडेकर आदींनी भाग घेतला. शेवटी संयोजक श्री. सुरेश तथा अण्णा लिमये यांनी प्रमुख अतिथी घोसाळकर तसेच अंबिका योगाश्रम ठाणे यांचे आभार मानले.