नद्यांची पाणी पातळी कमी संपूर्ण यंत्रणा सतर्क – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि.२२ (जिमाका)- आजच सकाळी सर्व यंत्रणांचा आणि जिल्ह्यातील पाऊस परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासन सर्वत्र लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात आहे. नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. संपूर्ण यंत्रणा सतर्क आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. आज सकाळपर्यंतची जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी तालुका निहाय पाहिली तर, तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली असली तरी, जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस नाही. त्याचप्रमाणे प्रमुख नद्यांची पाणी पातळी देखील इशारा रेषेच्या खालीच आहे. त्यामुळे पाणी भरण्यासारखी, पूर परिस्थिती निर्माण होणारी स्थिती नाही. जगबुडी नदीची पाणी पातळी देखील कमी होत आहे. सर्वच यंत्रणा सतर्क असून, कोणत्याही अफवांना बळी पडू नये. योग्य माहितीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले आहे.