रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांना बदला आणि ना. उदय सामंतांचे पद काढून घ्या

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात 26 मे 29 मे दरम्यान शिवसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख शरद बोरकर आणि जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी बहादूर शेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यात शिवसैनिक संतप्त झाले. पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांना बदला आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. उत्तर रत्नागिरी भागातील पाच तालुक्यातून पालकमंत्री बदलाच्या मागणीला बैठकीत जोर धरला होता. या भागातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपली खदखद पक्ष नेतृत्वासमोर मांडली.
माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह खेड, दापोली मंडणगड, गुहागर तालुक्याचे अध्यक्ष व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मंडणगड, गुहागर खेड दापोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.
विविध पदाधिकार्‍यांचा अहवाल पक्षाकडून नेहमी अहवाल मागवला जातो. मात्र मागील अडीच वर्षात पालकमंत्री अनिल परब यांनी काय काम केले? याचा प्रथम खुलासा करावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री आले आणि दोन गटात वाद लावून निघून गेले त्यानंतर पालकमंत्री राष्ट्रीय कार्यक्रम वगळता जिल्ह्यात कधी फिरकत नाहीत. असा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला नको, अशी  मागणी यावेळी पदाधिकार्‍यांनी केली. चिपळूण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रथम ही मागणी केली.  मंत्री सामंत यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत राहून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यावेळी तुमच्या मागण्या आम्ही पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवतो, अशी ग्वाही सुनील मोरे आणि शरद बोरकर यांनी दिल्यानंतर पदाधिकारी शांत झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button