
वडाच्या रोपांची लागवड करुन वटपौर्णिमा साजरी
रत्नागिरी वटपौर्णिमेचा दिवस शुक्रवारी सर्वत्र भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पण अलिकडील काळात वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वडाच्या फांद्या तोडून आणून त्यांची पूजा करण्याची वेळ आली आहे. शहरात तर अशा फांद्यांची बाजारात विक्री केली जाते. दुर्दैवाने ग्रामीण भागातही हेच चित्र दिसू लागले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी (ब्राह्मणवाडी) येथील महिलांनी एकत्र येऊन केवळ परंपरागत पद्धतीने पूजन न करता, वड आणि पिंपळाच्या रोपांची नव्याने लागवड केली आणि त्यांचे पूजन केले. याचबरोबर वड, पिंपळ, कदंब, कांचन, ताम्हण इत्यादी झाडांच्या रोपांची यंदाच्या वर्षी वाडीतील खासगी जमिनीवर लागवड करण्यात आली आहे.वाडीतील बचत गटाच्या महिला सदस्य प्रमिला खांबे, सविता म्हादे, कल्याणी राऊत, अनिता पांचाळ, ममता मणवे, गीता बाठे, ललिता म्हादे इ इत्यादींनी या उपक्रमात भाग घेतला. वाडीचे गावकर प्रकाश खांबे, पोलीस पाटील विलास राऊत, माजी उपसरपंच सुहास लिंगायत, विलास गोमाणे इत्यादींनी त्यांना या उपक्रमात सहकार्य केले.