
लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी,रत्नागिरीत लोकमान्य टिळकांना अभिवादन
भारतीय स्वातंत्र्य लढयात स्वराज्य हा जन्मसिध्द हक्क आहे अशी गर्जना करणाऱ्या नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या 100 व्या पुण्यतिथी दिनी येथील त्यांचे जन्मस्थान असणाऱ्या घरी शासनातर्फे अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रध्वज देखील फडकविण्यात आला.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते टिळक स्मारक या लोकमान्यांच्या टिळक आळीतील निवासात मेघडंबरीतील पूर्णाकृती पुतळयास पुष्पाजंली अर्पण करण्यात आली
टिळकांचे जन्मस्थान असणारे हे निवासस्थान आता भारतीय पुरातत्व संरक्षण खात्यातर्फे टिळक स्मारक म्हणून संरक्षित करण्यात आलेले आहे.
आज जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सकाळी भेट देऊन तेथील सर्व व्यवस्थेबाबत चर्चा केली. या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी वापरलेल्या वस्तू तसेच त्यांनी काढलेल्या दैनिक केसरी वृत्तपत्राच्या तसेच गीता रहस्याचे हस्तलिखित आणि टिळकांचा जीवनपट दाखविणाऱ्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत.
लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान आणि वास्तव्य रत्नागिरीत होते याचा प्रत्येक रत्नागिरी वासियाला अभिमान आहे. आज सकाळपासून त्यांना अभिवादन करण्यासाठी नागरिक येण्यास सुरुवात झाली होती.
या स्मृतीस्थळावर लोकमान्य टिळकांच्या सन्मानार्थ राष्ट्रध्वज फळविण्यात आला. या सोहळयास जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी, रत्नागिरीचे तहसिलदार शशिकांत जाधव तसेच पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
www.konkantoday.com