जिल्हा परिषद शाळांमध्ये संगमेश्वरात १७४ शिक्षक नव्याने दाखल
संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये १७४ शिक्षक नव्याने दाखल झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली. या भरतीमुळे शिक्षकांची भासणारी कमतरता दूर होणार आहे. संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३०० हून अधिक शाळा आहेत. शिक्षक भरती न झाल्याने शिक्षकांची कमतरता जाणवत होती. विद्यार्थी संख्या जास्त व शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. शिक्षक मिळावेत, यासाठी ग्रामस्थांनी वेळप्रसंगी आंदोलनेही केली आहेत. याची दखल शासनाने घेत नव्याने शिक्षक भरती करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यात १७८ पैकी १७४ शिक्षक हजर झाले आहेत. भरती प्रक्रियेपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्यात आली. ज्या ठिकाणी शुन्य शिक्षकी शाळा आहे त्या ठिकाणी नवीन शिक्षक रूजू झाले आहेत. या शाळेतील पूर्वीच्या शिक्षकांनी दोन दिवस त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे. www.konkantoday.com