
दहा लाखांच्या धनादेश चोरी व अपहारप्रकरणी दोन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता.
राजापूर : तालुका पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विभागात सन २०१३ मध्ये झालेल्या दहा लाखांच्या धनादेश चोरी व अपहार प्रकरणातील त्या दोन्ही आरोपींची राजापूर न्यायालयाचे न्यायाधीश सुरज नलवडे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केल्याची माहिती आरोपींचे वकिल ॲड. समीर कुंटे यांनी दिली आहे.राजापुर तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दहा लाख रुपयांच्या धनादेशाची चोरी होऊन अपहार झाला असल्याबाबतची फिर्याद तत्कालीन गटशिक्षणाधिकारी तानाजी नाईक यांनी राजापूर पोलिसांत दिली होती.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी वाघू शंकर कोडलकर, संजय दत्ताराम नेवरेकर व या खटल्यातील फिर्यादी असलेले तत्कालीन गटशिक्षणाधिकारी तानाजी भिकू नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास काम करून राजापूर पोलिस स्थानकातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विलास सुतार यांनी राजापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी राजापूर न्यायालयात खटला सुरू होता. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने असंख्य साक्षीदार तपासण्यात आले. दरम्यान यातील संशयीत आरोपी संजय नेवरेकर याचा न्यायालयात खटला सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित दोन संशयीत आरोपींविरोधात न्यायालयात हा खटला सुरू होता. यावर झालेल्या सुनावणीअंती काल (२८ मे) रोजी राजापूर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दरम्यान या प्रकरणी राजापूर न्यायालयाचे न्यायाधीश नलवडे यांनी बुधवारी निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणी सबळ पुराव्याअभावी या दोन्ही संशयीत आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.या प्रकरणी संशयित आरोपी वाघू कोडलकर यांच्या वतीने ॲड. प्रवीण सुर्वे, ॲड. समीर कुंटे, तर तानाजी भिकू नाईक यांच्या वतीने ॲड. यशवंत कावतकर, ॲड. विकास पळसमकर, ॲड. निखिल तेरवणकर यांनी काम पाहिले.