रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा देशपातळीवर गौरव
एकात्मिक फलोद्यान विकास अभियानाची १८ वी वार्षिक आढावा सभा नुकतीच श्रीनगर-जम्मू काश्मिर येथे शेर ई काश्मिर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात पार पडली. यामध्ये दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सन २०२३-२४ मध्ये केलेल्या कार्याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने विद्यापीठाला प्रमाणपत्र व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.एकात्मिक फलोद्यान विकास अभियान योजना दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध १५ संशोधन केंद्रांवर कार्यरत आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मसालावर्गीय पिकांच्या उत्तम प्रतींची कलमे रोपांची निर्मिती करणे हे असून या माध्यमातून कोकणातील मसालावर्गीय पिकांखालील क्षेत्र वाढवणे हा उद्देश आहे. त्यासाठी संचालक, सुपारी व मसाला विकास संचनालय, कालिकत, केरळ यांचेकडून दरवर्षी अनुदान प्राप्त होते. सदर योजनेंतर्गत दरवर्षी शेतकर्यांसाठी मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावर मोफत शेतकरी प्रशिक्षणवर्ग संपूर्ण कोकणामध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात येतात.श्रीनगर-जम्मू काश्मिर येथे शेर-ई-काश्मिर कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात पार पडलेल्या या सभेस उद्यानविद्या आयुक्त डॉ. प्रभात कुमार, राष्ट्रीय संशोधन केंद्र, संचालक डॉ. विनय भारद्वाज, भारतीय मसालापिके अनुसंधान संस्था, कालिकतचे संचालक डॉ. आर. दिनेश, सुपारी व मसाला विकास संचालनालय, कालिकत, केरळचे संचालक डॉ. होमी चेरियन उपस्थित होते. www.konkantoday.com