बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुढील वर्षी २३ जानेवारी रोजी जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न
ई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामाची शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुढील वर्षी २३ जानेवारी रोजी जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.बाळासाहेबांचे स्मारक असलेल्या जागेजवळ समुद्र आहे. त्यामुळे पाण्याचा रेटा प्रचंड येत असतो. त्या अडचणींवर मात करत काम झाले आहे. अजून काही बारीक सारीक गोष्टी अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे संग्रहालय बांधण्यात येणार आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात राज्यातील जनतेकडे जी माहिती असेल ती त्यांनी शिवसेना भवन किंवा स्मारकावर आणून द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. बाळासाहेबांचे फोटो, लेख, बातम्या किंवा बाळासाहेबांचा जीवनप्रवास दाखवणारी इतर कोणतीही माहिती द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.www.konkantoday.com