
दर्जाहीन गॅस शेगड्यांची विक्री करणार्या तामिळनाडूतील विक्रेत्यांना चिपळूणच्या व्यापार्यांनी रोखले
शहर व परिसरात दर्जाहीन गॅस शेगड्यांची विक्री करणार्या तामिळनाडूतील काही विक्रेत्यांना चिपळुणातील व्यापार्यांनी मंगळवारी चांगलाच इंगा दाखवला. भविष्यात हलक्या दर्जाच्या या गॅस शेगडीचा स्फोट होवून नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल करीत आक्रमक झालेल्या भांडी व्यापार्यांनी त्या विक्रेत्यांना पुन्हा परतवून लावले. तसेच पुन्हा चिपळुणात पाऊल ठेवू नका, असा गर्भीत इशाराही दिला. या संघटनेचे चिपळूण व्यापारी महासंघानेही समर्थन केले असून एकवटलेल्या भांडी व्यापार्यांचे कौतूक केले.चिपळूण शहरातील विविध भागात मंगळवारी तामिळनाडू येथील काही विक्रेते गॅस शेगड्यांची विक्री करीत होते. या विक्रेत्यांनी तीन वाहने भरून येथे सिंगल बर्नरच्या गॅस शेगड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. एका शेगडीची किंमत ३ हजार सांगून ती चक्क पंधराशे रुपयांना विकत होते. याबाबतची माहिती चिपळुणातील काही भांडी व्यावसायिकांना मिळाली. त्यांनी तातडीने एकत्र येत ज्या ठिकाणी या गॅस शेगड्यांची विक्री सुरू आहे तेथे धाव घेतली. त्यांनी या गॅस शेगड्यांची तपासणी केली. यावेळी या गॅस शेगड्या बाजारपेठेत मिळणार्या शेगड्यांपेक्षा हलक्या व दर्जाहीन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. www.konkantoday.com