
तीन महिने थकलेल्या वेतनाची हमी घेतल्याने कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे काम बंद आंदोलन मागे
जिल्ह्यातील ६७ जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १०२ रूग्णवाहिकांद्वारे २४ तास सेवा देणार्या कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे वेतन गेले. ३ महिने थकल्याने चालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी वेतनाची हमी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.जिल्ह्यातील कंत्राटी रूग्णवाहिका सेवेचा ठेका विनसोल सोल्युशन प्रा. लि. पुणे या कंपनीला १३ मार्च २०२४ पासून देण्यात आला होता. मात्र एकूण रकमेवरील जीएसटी रक्कम न दिल्याने कंपनीने ठेका घेण्यास नकार दिला. प्रसंगी ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आल्याने जिल्ह्यातील रूग्णवाहिका चालकांचे वेतन गेले ३ महिने रखडले आहे.आता नव्याने ठेका निविदा काढण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालकांचे वेतन ठप्प झाल्याने याविरोधात सर्व रूग्णवाहिका चालकांनी १० जूनपासून रूग्णवाहिका सेवा बंद करण्याचा इशारा दिला होता. अखेर मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी हमी दिल्याने हे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. www.konkantoday.com