काँग्रेसची कामगिरी पाहता त्यांना विधानसभेत सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी पाहता त्यांना विधानसभेत सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून काँग्रेस 100 ते 105 जागांवर लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने 17 जागा लढवल्या होत्या, त्यातील 13 उमेदवार विजयी झाले आहेत. तर उबाठाला 9, शरद पवार गटाला 8 जागांवर विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसचे अधिक जागांचा दावा केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट 90 ते 95 जागांवर आणि शरद पवार गटाला80 ते 85 जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढवून राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केला असल्याचे आघाडीतील एका नेत्याने सांगितले.www.konkantoday.com