कोयना एक्सप्रेसने तिघींना चिरडले! दोन महिलांसह मुलीचा मृत्यू!!
कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसने शुक्रवारी रात्री तिघांना चिरडले. मार्केट यार्डजवळ रात्री आठच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याचे काहींनी सांगितले. यामुळे अपघात की आत्महत्या याबाबत घटनास्थळी चर्चा सुरू होती.मुंबईहून कोल्हापूरला येणारी कोयना एक्स्प्रेस मार्केट यार्डपासून पुढे कोल्हापूर स्थानकाच्या दिशेने येत होती. याचवेळी विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने या तिघीजणी रुळावरूनच चालत जात होत्या. याचवेळी भरधाव आलेल्या कोयना एक्स्प्रेसने तिघींनाही चिरडले. या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि लहान मुलगी दुसर्या बाजूला पडल्या.रेल्वेची धडक इतकी जोरात होती की, दोन महिलांचे चेहरे छिन्नविच्छिन्न झाले. लहान मुलगीही जागीच ठार झाली. दरम्यान दोन महिला, लहान मुलीला धडक बसताच लोको पायलटने रेल्वेचा वेग कमी करत ती काही अंतरावर नेऊन थांबवली. रेल्वे अचानक थांबल्याने परिसरातील नागरिकही रुळाच्या दिशेने आले. यावेळी या तिघींचेही मृतदेह आढळून आले. लोको पायलटने ही माहिती रेल्वेगार्डला दिली. त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. www.konkantoday.com