रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई आराखड्यातील विंधन विहिरींची कामे रखडली
पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्ह्याच्या यावर्षीच्या पाणीटंचाई आराखड्यातील विंधन विहिरींची कामे रखडल्याची बाब समोर आली. जिल्ह्यातील ३१ विंधन विहिरींच्या आराखड्यातील कामापैकी पावसाळा सुरू झाला असताना केवळ ५ विंधन विहिरी मारून पूर्ण झाल्याचे जि.प. प्रशासन सूत्रांकडून सांगण्यात आले.यावर्षी पाणीटंचाईचा आराखडा तयार करताना तालुक्यांचा पाणीटंचाई आराखडा सादर होण्यास विलंब झाला होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे हे आराखडे जि.प. पाणीपुरवठा विभागाकडे सादर झाल्यानंतर जिल्ह्यांचा पाणीटंचाई आराखडा अंतिम मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला.पाणीटंचाईवर पुढील उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून संभाव्य अंतिम आराखडा तयार करून त्याला मंजुरी देण्यात आली होती. यात पाणी योजना दुरूस्ती, टँकर, विंधन विहिरी खोदाई, विहिरी अधिग्रहीत करण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. पण त्या टंचाई आराखड्यातील उपाययोजनांची कामेच रखडली.विंधन विहिरी मारण्यासाठी ३१ कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी प्रत्यक्ष ५ विंधन विहिरींची कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. त्यात राजापूर तालुक्यात २, रत्नागिरीत १ तर दापोलीमध्ये ३ कामांचा समावेश आहे. www.konkantoday.com