चिपळुणात खेर्डीतील कारखान्यांचे दूषित पाणी वाशिष्ठीत सोडल्यामुळे नागरिकांना मिळतेय प्रदूषित पाणी
चिपळूण शहरातील मार्कंडी, काविळतळी परिसरात नळाच्या पाण्याला उग्र वास येत असल्याने नगर परिषदेने त्याची कारणे शोधण्यास सुरूवात केली आहेत. यातूनच खेर्डी येथील काही कारखान्यांमधून दूषित पाणी सोडले जात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून अशा कारखानदारांना सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रशासनाने एमआयडीसी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील कार्यालयाकडे बुधवारी पत्राद्वारे केली. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी रत्नागिरीत पाठवण्यात आले असून त्याचा ८ दिवसात अहवाल येणार आहे.अर्ध्या शहराला खेर्डी-माळेवाडी येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. कायम चांगले पाणी मिळावे म्हणून जॅकवेल परिसरात वाशिष्ठी नदीत बंधारा घालण्यात आला आहे. त्यामुळे येथे कायम पाणीसाठा राहत असल्याने अर्ध्या शहरासह अडचणींच्या काळात संपूर्ण शहराला येथूनच पाणी पुरवले जाते. त्यामुळे जॅकवेल शहरासाठी वरदान असल्याचे म्हटले जाते. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून मार्कंडी, काविळतळी परिसरात पुरवठा होणार्या पाण्याला उग्र वास येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी मंगळवारी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नागेश पेठ यांना बरोबर घेवून खेर्डीतील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. पाहणीत जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक असणारी स्वच्छता दिसली. तसेच तुरटी, ब्लिचिंग पावडर, क्लोरीन सिलेंडर आदी साहित्यही उपलब्ध असल्याचे दिसले. त्यामुळे पाण्याचा उग्र वास का येतो याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता काही दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसानंतर खेर्डी एमआयडीसीतील काही कारखान्यांनी दूषित पाणी सोडले असावे व त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने यातील काही पाणी बंधार्यामुळे जॅकवेल परिसरातच राहिल्याने हा प्रकार घडत असल्याचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कारखानदारांना पाणी न सोडण्याच्या व त्याची सोय त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याच्या सूचना द्याव्यात, असा पत्रव्यवहार नगर परिषदेने एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शहरातील कार्यालयाकडे केला आहे. www.konkantoday.com