स्वराज्य प्रतिमा खरेदी गैरव्यवहाराची चौकशी करा, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी
ग्रामपंचायतीत शिव स्वराज्य दिन साजरा करताना स्वराज्य प्रतिमा चढ्या दराने खरेदी करण्याचा धाक दाखवत स्थानिक बाजारपेठेत पाचशे ते हजार रुपये दराने घेण्यात आल्या. त्यामुळे या प्रतिमा खरेदी करण्याचा आग्रह ग्रामपंचायतींना कोणी दिला, याची सखोल चौकशी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहार करणार्यांवर कडक कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण पंचायत समिती आणि तालुक्यातील ग्रामपंचायतीत ६ जून रोजी शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यासाठी स्वराज्य प्रतिमा एकाच विक्रेत्याकडून खरेदी करण्यासाठी पंचायत समितीने ग्रामपंचायतींना बंधनकारक केले. यासाठी बड्या दराच्या स्वराज्य प्रतिमा नियुक्त एजन्सीजकडून खरेदीसाठी दबावतंत्राचे धोरण वापरण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तालुक्यात लाखोंचा गैरव्यवहार झाला आहे. हे शोभनीय नाही. या स्वराज्य प्रतिमा पंचायत समिती गटविकास अधिकार्यांच्या दालनात का ठेवण्यात आल्या, ग्रामपंचायतींना एकाच ठिकाणाहून खरेदी करण्याची जबरदस्ती कोणी केली, किती ग्रामपंचायतींनी चार हजार रुपये दराने प्रतिमा खरेदी केल्या गेल्या, याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी केली.www.konkantoday.com