
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत आता १५ विविध प्रकारच्या पाककृती निश्चित
राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) आता १५ विविध प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत.
नवीन पाककृतींची अंमलबजावणी ही २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना दर दोन आठवड्यांत दररोज नवे पदार्थ देणे शक्य होईल. अनेक विद्यार्थी शिजवलेला आहार पूर्णत: खात नसल्याने त्यांना गरजेप्रमाणे तांदळाचे पदार्थ तयार करून दिल्याने यातून तांदूळ, डाळी, कडधान्ये याचीही बचत होणार आहे.
शालेय पोषण आहारात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तसेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त असा आहार दिला जातो.
या योजनेसाठी केंद्राकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रती विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम व उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ आणि त्यापासून बनविलेले पदार्थ दिले जातात. यात आता स्थानिक अन्नधान्य, तृणधान्य व इतर पदार्थांचा समावेश केला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या आहार तज्ज्ञांच्या समितीने सूचना करून नवीन पाककृती सुचविल्या होत्या.
आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्याची तरतूद
अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव अथवा फळ
शाळांतील परसबागेतील भाजीपाल्यांचा वापरही केला जाईल.
आठवड्यातील चार दिवस तांदळाची खीर, एक दिवस नाचणी सत्त्व
नवे पदार्थ
व्हेजिटेबल पुलाव, मसालेभात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, अंडा पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा वरण भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com