देवरूख रूग्णालय शवपेटीची अवस्था बिकट, शवपेटीला द्यावा लागतोय दगडाचा आधार
मृत मानवी शरीराचे जतन करण्यासाठी वातानुकुलीत पेटी अर्थात शवपेटीची आवश्यकता असते. देवरूख ग्रामीण रूग्णालयात शवपेटी दाखलही झाली आहे. नूतन इमारतीत रूग्णालय सुरू होण्याआधीच या शवपेटीला दगडाचा आधार द्यावा लागल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.देवरूख हे संगमेश्वर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तालुक्याच्या कानाकोपर्यातून रूग्ण येथे उपचार करून घेण्यासाठी येत असतात. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तत्काळ येथे दाखल केले जाते. मृत व्यक्तींच्या शवाचे विच्छेदन करण्यासाठी मृतदेह येथे आणले जातात. काहीवेळा शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नसणे, मृत व्यक्तींची ओळख न पटणे, मृत व्यक्तीचे नातेवाईक दूरवरून येणे आदी कारणांमुळे मृत मानवी शरीराचे जतन करण्यासाठी शवपेटीची आवश्यकता असते. अनेक वर्षांच्या मागणीनंतर शवपेटी देवरूख ग्रामीण रूग्णालयाला प्राप्त झाली आहे. शवविच्छेदनगृहात ही पेटी ठेवण्यात आली आहे. शवपेटीच्या चार खुरांपैकी १ खूर तुटला असून याला दगडाचा आधार देण्यात आल्याचे चित्र असून ही एक हास्यास्पद व दुर्दैवी बाब आहे.www.konkantoday.com