
आत याल तर जीव देऊ! कात्री दाखवत आरोपी महिलेची पोलिसांना धमकी; सावंतवाडीत 80 किलो गोमांस जप्त
सावंतवाडीशहरातील बाहेरचावाडा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून ८० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एका दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (वय ४५) आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा (वय ४०) अशी आहेत.सावंतवाडी पोलिसांना ही माहिती गोपनीय स्रोतांकडून मिळालेली होती. यानुसार, पोलिसांनी बाहेरचावाडा येथील त्या घरात धाड टाकून संशयित दाम्पत्याला ताब्यात घेतले. घरात तपासणी करताना पोलिसांना विरोध केला गेला.
दरवाजे उघडले नसल्यामुळे पोलिसांनी जीपवरील अनाउन्सर सिस्टीमद्वारे सूचना दिल्या आणि घरातील लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सहकार्य न केल्यास खिडक्या फोडून कारवाई केली जाईल, असे सांगितले.घरातील संशयित सनोबरने हातात कैची घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि आत प्रवेश केल्यास आत्महत्येची धमकी दिली. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासणीत घरातील फ्रीजमध्ये ८० किलो गोमांस आढळले.




