बेकायदेशीर मासेमारीबाबत दाखल असलेल्या प्रकरणांवर तातडीने सुनावणी होणार
बेकायदेशीर मासेमारीबाबत दाखल असलेल्या प्रकरणांवर तातडीने सुनावणी होणार आहे.सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर ही सुनावणी होते. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांचीही निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्या प्रकरणांचा निपटारा करण्यावर मर्यादा आल्या होत्या.
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रीक्षेत्रात अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर २ वर्षांपूर्वीपर्यंत संबंधित तहसीलदारांसमोर अशा प्रकरणांची सुनावणी होत होती. महसूलच्या इतर कामांच्या व्याप्तीमुळे या प्रकरणांचा निपटारा वेळेत होत नव्हता; परंतु सुधारित मासेमारी कायदा झाल्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना अभिनिर्णय अधिकारी पदाचा दर्जा मिळाला आणि या प्रकरणांची सुनावणी सहाय्यक आयुक्तांसमोर होऊ लागली. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांचीही निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्ती झाली. त्यामुळे दाखल झालेली अनेक प्रकरणे सुनावणीविना राहिली आहेत. ती आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तातडीने निकाली काढली जाणार आहेत. दरम्यान, नुकत्याच संपलेल्या मासेमारी मोसमात अवैध मासेमारी करणाऱ्या नौका मालकांना ८० लाख रुपयांचा दंड झाला असून, सुमारे ५० लाख रुपये दंडाची वसुली झाली आहे. इतर प्रकरणेही निकाली लागल्यानंतर दंडाच्या रकमेची शासन महसुलात भर पडणार आहे.
www.konkantoday.com