ज्येष्ठांनी आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी, वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी : डॉ. अश्विन वैद्य
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : दृष्टी चांगली असेल तर जीवन समाधानाने जगता येते. त्यामुळे जेष्ठांनी वेळोवेळी आपल्या दृष्टीची तपासणी करून घ्यावी, डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ तसेच नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर आश्विन वैद्य यांनी केले. श्रीराम मंदिर जेष्ठ नागरिक कट्टा मासिक रौप्य महोत्सवी मेळाव्यात ‘ज्येष्ठांनी डोळ्यांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले मधुमेह आणि ब्लड प्रेशर यामुळे डोळ्यांच्या विशिष्ट भागांना इजा पोहोचते. मोतीबिंदू आणि काचबिंदू होऊ नये यासाठी मधुमेह दूर ठेवावा, प्रेशर नेहमी नियंत्रणात ठेवावा, तसेच डोळ्यांचा प्रेशर वेळोवेळी डॉक्टरकडून तपासून घ्यावा, असे आवाहनही डॉक्टर वैद्य यांनी केले.
श्रीराम मंदिर जेष्ठ नागरिक कट्टाची रौप्य महोत्सवी सभा शनिवारी येथील श्री राम मंदिर येथे पार पडली. श्रीराम मंदिर संस्था आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या प्रमुख सौ. उर्मिलाताई उल्हासराव घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर श्रीराम मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. मिलिंद पिलणकर, श्रीराम मंदिर कट्टाचे अध्यक्ष तथा संयोजन प्रमुख अण्णा लिमये, ज्येष्ठ समाजसेवक कुमार शेट्ये तसेच श्रीराम मंदिर संस्था, मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, कार्यकारणी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुधाकर सावंत यांनी श्रीराम मंदिरात ज्येष्ठांच्या चांगल्या आरोग्यासाठी श्रीरामाला साकडे घातले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा चे अध्यक्ष अण्णा लिमये यांचा उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळेस योग प्रशिक्षिका स्मिता साळवी, समाजसेवक कुमार शेट्ये, डॉक्टर अश्विन वैद्य आणि मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दिलीप पाखरे यांनी केले तर ॲड. पिलणकर यांनी आभार मानले. जून महिन्यात वाढदिवस असलेल्या जेष्ठांना यावेळी गुलाब पुष्प आणि शुभेच्छापत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे श्री. संतोष रेडीज , तसेच कट्टा चे सचिव श्री. सुरेंद्र घुडे आणि श्री. रमाकांत पांचाळ यांनी परिश्रम घेतले.
www.konkantoday.com