
गुहागर मध्ये प्रसादाचे पेढे खाल्ल्याने 11 महिला रुग्णालयात, प्रकृती स्थिर
श्रावणाचा सण सध्या असल्याने अनेक धार्मिक कार्यक्रमात मिठाई किंवा पेढे वाटले जात आहेत मात्र त्याच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे एका बेकरीमधून आणलेले पेढे खाल्ल्याने एका ज्वेलरी दुकानात काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या महिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर आहे.
श्रावण महिना असल्याने एका महिलेने सकाळी शृंगारतळी येथील एका बेकरीतून पेढे आणले. ते प्रसाद म्हणून सर्व महिलांना वाटले गेले. प्रत्येक महिलेने पेढा खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना चक्कर आणि उलटी होण्याचा त्रास सुरू झाला. या महिलांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेत विषबाधा झालेल्या महिलांमध्ये स्वप्नाली पवार, प्रतीक्षा मोहिते, पूजा मोहिते, वृषाली पवार, विदिशा कदम, सोनाली नाईक, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, प्रिया मोहिते, संजना गिरी आणि मानसी शिगवण यांचा समावेश आहे. या सर्व महिला तळवली, मळण, पालपेणे येथील रहिवासी आहेत. आता गणपतीचा सण आहे जवळ आला असून मोठ्या प्रमाणावर पेढे व मिठाईची खरेदी अनेक दुकानातून होत असते त्यामुळे अन्नभेसळ विभागाने तक्रारीची वाट न पाहता दुकानांच्या मालाची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवावे अशी आता मागणी होत आहे




