
जिल्ह्यातील 3 हजार शाळांमध्ये आनंददायी उपक्रम
रत्नागिरी: विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीची जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा व खासगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 2022-23 पासून इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय परिपाठात आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे, तसा आदेश शासनाने काढला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील 3 हजार शाळांमध्ये हा उपक्रम दिसणार आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी शालेय शिक्षणात वेगवेगळ्या उपक्रमांचा समावेश करुन विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठीचे वेळपत्रकही शिक्षण विभागाने तयार केले आहे. जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळणार आहे.
सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण-तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक हिंसात्मक घटनांना सामोरे जावे लागत असून, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ही चिमुकली उचलत आहेत. विद्यार्थ्यांना स्वत:मधील आनंद समजणे, तो घेता यावा, अनुभवता यावा, यासाठी त्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. आनंददायी अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. या पाठ्यक्रमात सजगता, कथा किंवा गोष्टी, कृती, अभिव्यक्ती या चार घटकांचा समावेश असलेल्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक वारानुसार उपक्रमांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना हसत-खेळत आनंददायी शिक्षण मिळणार असल्याने त्यांचा अभ्यासामुळे येणारा ताण कमी होणार आहे. शालेय शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळणार आहे. आनंददायी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी परिपाठ झाल्यानंतर पहिल्या तासातील 35 मिनिटांमध्ये करावयाची आहे. शाळेत परिपाठानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमधून आनंद घेता येणार असल्याने दिलेल्या माहितीचे चांगल्या पद्धतीने आकलन होणार असून, शिकण्यासाठी चांगली शैक्षणिक वातावरण निर्मिती होईल, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, असे मत शिक्षण तज्ञांकडून व्यक्त होत आहे.