लोकलच्या गर्दीमुळे डोंबिवलीतील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला
लोकलच्या गर्दीमुळे डोंबिवलीतील एका 37 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.केयुर सावळा असे मृत तरुणाचे नाव असून गुरुवारी सकाळी कोपर ते दिवा स्थानकाच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. केयुरचा लोकल प्रवासातील मित्र बबन शिलकर याने त्याचा जीव वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे केयुरचा जीव वाचू शकला नाही. डोंबिवलीत राहणारे केयुर सावळा व बबन शिलकर हे दोघे गुरुवारी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले. डोंबिवली स्थानकातून सकाळची 9 वाजून 25 मिनिटांची जलद लोकल ते नेहमी पकडतात. गुरुवारी सकाळी देखील ते ही लोकल पकडण्यासाठी स्थानकात उभे होते. लोकलला गर्दी असल्याने कसरत करत दोघांनी आत चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बबनला आतमध्ये शिरता आले, मात्र केयूरला आत शिरता येत नव्हते. बबनच्या पाठीमागे लोकलच्या दारात गर्दीमुळे अडकला. केयूर दारात अडकल्यामुळे बबन यांनी त्याला हात दिला. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते.बबनच्या हातातला केयूरचा हात सुटला आणि दिवा स्थानका जवळ केऊर लोकल मधून खाली पडला. केयूर लोकल मधून पडल्यानंतर बबन यांनी दिवा रेल्वे स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. केयुरला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्यात आली. परंतु, रुग्णवाहिका बाहेर गेली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. उशीर व्हायला नको म्हणून बबन यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या केयुरला तीन चाकी टेम्पो मध्ये घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. केयूर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
लोकांच्या गर्दीमुळे डोंबिवलीतील आणखीन एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे
www.konkantoday.com