
शिवपुतळा सुशोभिकरणातील दगड काम निकृष्ट झाल्याची माजी नगरसेवकाची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
चिपळूण शहरात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणातील दगड काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. या कामाचे १ कोटी ३५ लाख रुपयांचे अंदाजपत्रकही बोगस असल्याची तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांच्याकडे केली असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही माहिती त्यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या काही वर्षापासून शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावासोबत सुशोभिकरणासाठी वापरल्या जाणार्या दगड कामाचे ८८ लाख रुपयांचे अंदाजपत्रकही जोडण्याात आले होते. त्याला तांत्रिक मान्यता मिळण्यापूर्वीच महापुरानंतर बांधकाम विभागातून ही फाईल गहाळ झाली. त्यामुळे पुन्हा अंदाजपत्रक सादर करण्यात आले मात्र त्यात तब्बल ४७ लाख इतकी भरमसाठी रक्कम वाढवण्यात आली. त्याला कोणतेही कारण देण्यात आले नसल्याने हे अंदाजपत्रक बोगस आहे. www.konkantoday.com