पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात

राळेगणसिद्धी (अहमदनगर) :: पर्यावरणाच्या दृष्टीने सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे. विषयाचं गांभीर्य कमी झालंय. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रातील अनास्था कमी करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिलं पाहिजे. नदीविषयीच्या आमच्या श्रद्धा गढूळ झाल्या तेव्हा नदीचे पात्रदेखील गढूळ होत गेले आहे. आम्ही धरणांचे पाणी पिऊ लागलो, तेव्हा नदीची आवश्यकता संपली. नदीपासून दूर गेलेल्या लोकांना नदीच्या जवळ आणले पाहिजे. आम्ही कोकणात वाशिष्टी नदीला साडी नेसवण्याचा उपक्रम केला. नदीची परिक्रमा केली. खूप पर्यटक, जिज्ञासू आले. गावातील कुतूहल जागृत झालेली लोकं वेगळेपणा पाहायला आली. लोकांना पर्यावरण संवर्धनाशी जोडण्यासाठी पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्या असल्याचे मत कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने आयोजित ‘वृक्षमित्र’ स्व. आबासाहेब मोरे जयंती व पर्यावरण कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वनविभाग पालघरचे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक प्रभाकर म्हस्के, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहमदनगरचे उप-प्रादेशिक अधिकारी चद्रकांत शिंदे, कोकणातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, पर्यावरणप्रेमी विलास महाडिक, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे होते. वाटेकर म्हणाले, ‘आपल्याकडे नदी कृतज्ञतेचे उत्सव व्हायला हवे आहेत. नद्यांच्या सांस्कृतिक संचितांच्या परिक्रमा व्हायला हव्या आहेत. नदी तिच्या काठाने संस्कृती निर्माण करते. असेच संस्था एक सांस्कृतिक जीवन निर्माण करत असते. मानवी सांस्कृतिक जीवन अधिक विशुद्ध व्हावं यासाठी तुरटीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. असे कार्यकर्ते ‘वृक्षमित्र’ स्वर्गीय आबासाहेबांनी पर्यावरण मंडळाला राज्यभर मिळवून दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. कितीही समजावले तरी लोकं उघड्यावर कचरा टाकतात. आम्हाला आमचे हक्क कळतात पण कर्तव्य समजत नाहीत. निसर्गाप्रतीची आमची अनास्था आजच्या आजच्या पर्यावरणीय समस्यांचे मूळ असल्याचे वाटेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात ‘वृक्षमित्र’ स्वर्गीय आबासाहेब मोरे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंडळातील सेवानिवृत्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आभार ज्ञानेश्वर कऱ्हाळे (नांदेड) यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यभरातील नंदूरबार, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, वर्धा, सोलापूर, लातूर आदी पंचवीसेक जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button