
सरकारकडून जारी केलेल्या लेक लाडकी योजनेसाठी दापोलीतून ३५ लाभार्थी
सरकारकडून जारी केलेल्या लेक लाडकी या योजनेला दापोली तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे. दापोली तालुक्यातून ३५ मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर अजून काही मुलींच्या पालकांनी पंचायत समिती एकात्मिक बालविकास केंद्रात अर्ज केले आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात दापोलीत लेक लाडकी, या योजनेतील लाभार्थ्यांचा आकडा वाढणार असल्याचे एकात्मिक बालविकास केंद्राकडून समोर आले. या योजनेतून मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला आर्थिक मदत मिळणार आहे. ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाणार असून पूर्णतः १ लाख १ हजार रुपये, असे या रक्कमेचे स्वरूप आहे, यात मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये या कुटुंबाला मिळणार आहेत. ही मुलगी पहिलीला गेली की ६ हजार रुपये मिळतील. सहावीत गेली की ७ हजार रूपये मिळणार आहेत. तसेच पुढच्या शिक्षणासाठीही सरकारकडून पैसे दिले जातील. ही मुलगी अकरावीत गेली की, ८ हजार रुपये दिले जातील. तर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. १ एप्रिल २०२३ या दिवसानंतर जन्माला येणार्या मुलींसाठी सरकारने ही विशेष योजना आखली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना ही योजना लागू होते. या मुलीला या योजनेतून लाभ मिळणार आहे. दापोली तालुक्यात २ एकात्मिक बालविकास केंद्र आहेत. प्रथम दापोली या केंद्रातून आतापर्यंत २७ जणांना याचा लाभ दिला गेला आहे. www.konkantoday.com