
नागरिकांच्या तक्रारीनंतर चिपळूण शिवाजीनगर ’सीएनजी’ रात्री राहणार बंद
चिपळूण शहरातील शिवाजीनगर परिसरातील अशोका कंपनीचा महानगर सीएनजी पंप आता रात्री बंद राहणार आहे. पंपातील जनरेटर, कॉम्प्रेसरचा त्रास होत असल्याने येथील दोन अपार्टमेंटमधील ६० कुटुंबांनी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठक झाली. त्यात वरील निर्णयासह ६ महिन्यात पर्याय काढण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी जानेवारी २०२६पर्यंत उपोषण स्थगित केले आहे.
याबाबत नागरिकांनी दिलेल्या उपोषणाच्या अर्जात म्हटले आहे की, शिवाजीनगर बसस्थानक परिसरात गेल्या ३२ वर्षांपासून प्रथमेश व इंदिरा अपार्टमेंटमध्ये ६० कुटुंबे राहतात. या कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुलेही आहेत. असे असताना येथे ३
वर्षांपासून अशोका कंपनीचा महानगर हा सीएनजी पंप सुरू झाला आहे. या पंपातील जनरेटर व कॉम्प्रेसरमुळे आमची रात्रीची झोप गायब झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
www.konkantoday.com




