
“….आणि हळूहळू मी शून्य जाऊ लागलो!” कन्याकुमारीचा अनुभव सांगत निकालाच्या एक दिवस आधी मोदींची पोस्ट
लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे १ जून रोजी संपले आहेत. देशाच्या लोकशाहीचा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी या ठिकाणी तीन दिवस ध्यानधारणा केली. १ जूनचा मतदानाचा टप्पा पार पडण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला गेल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. तसंच त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचाही विरोधकांचा सूर होता. अशात पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा संपल्यानंतर नव्या संकल्पांची पोस्ट लिहिली आहे. ज्याची चर्चा होते आहे.*काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट?*“लोकशाहीची जननी असलेल्या आपल्या देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव पार पडला आहे. तीन दिवस आध्यात्मिक सानिध्यात घालवल्यानंतर दिल्लीला जाण्यासाठी मी विमानात बसतो आहे. मी एक खास उर्जा माझ्यासह घेऊन निघालो आहे. ““२०२४ च्या निवडणुकीत कितीतरी सुखद योगायोगही मी पाहिले आहेत. आपला देश अमृतकाळात आहे. या निवडणुकीचा प्रचार मी १८५७ च्या उठावाचं प्रेरणास्थळ असलेल्या मेरठ येथून सुरु केला. त्यानंतर भारताचा प्रवास करताना माझी शेवटची सभा पंजाबमधल्या होशियारपूर या ठिकाणी पार पडली. संत रविदास यांची ही भूमी आहे. पंजाबमध्ये माझी अखेरची प्रचारसभा पार पडल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यानंतर मला कन्याकुमारी या ठिकाणी येऊन शांतता लाभली. भारतमातेच्या पायाशी मी बसलो होतो असाच अनुभव मी या ठिकाणी घेतला.”*मी ध्यानधारणा सुरु केली तेव्हा बराच कोलाहल होता*“मी ध्यानधारणा सुरु केली तेव्हा सुरुवातीला माझ्या डोक्यात बराच कोलाहल होता. माझ्यासमोर माझ्या निवडणुकीच्या प्रचारसभा, रॅली, लाखो माता भगिनींचे आशीर्वाद, त्यांनी दाखवलेलं असीम प्रेम, विश्वास, आपुलकी हे सगळं सगळं येत होतं. त्यामुळे माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले. हळूहळू मी शू्न्यात जाऊ लागलो, योगसाधना सुरु झाली.”“काही वेळ गेल्यानंतर राजकीय वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप, मला देण्यात आलेली दूषणं हे सारंही मला आठवलं. पण मी शून्यात जात होतो. माझ्या मनात विरक्तीचा भाव निर्माण झाला. माझं मन आणि बाहेरचं जग यांचा संबंध हळूहळू लोप पावला. एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असताना अशा प्रकारे ध्यान करणं कठीण असतं. मात्र स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने मी हे साध्य करु शकलो. कन्या कुमारीच्या उगवत्या सूर्याने माझ्या विचारांना नवी उंची दिली. तर समुद्राच्या विस्तीर्णतेने माझ्या विचारांना दृढता दिली. ब्रह्मांडातल्या एका सुंदर शांततेचा आणि एकाग्रतेचा अनुभव मी ध्यानधारणेत गेला. ” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.*कन्याकुमारी संगमांच्या संगमांची भूमी*“कन्याकुमारी संगमांच्या संगमांची भूमी आहे. आपल्या देशातल्या पवित्र नद्या विविध समुद्रांमध्ये जाऊन मिळतात आणि या ठिकाणी समुद्रांचा संगम आहे. विवेकानंद स्मारकासह या ठिकाणी संत तिरुवल्लूर यांची विशाल प्रतिमा, गांधी मंडपम आणि कामराजर तसंच मंडपम आहे. भारत हजारो वर्षांपासून विचारांची देवाणघेवाण करणारा देश आहे. आर्थिक, भौतिक मापदंडांच्या पुढे जाऊन देशाने विचारांची शक्ती आपल्याला दिली आहे. भारताच्या कल्याणासह जगाचं कल्याण हा विचार यातूनच आला आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपला स्वातंत्र्य संग्राम आहे. “आज भारताचं गव्हर्नंस मॉडेल हे जगासाठी आदर्श उदाहरण ठरतं आहे. मागच्या १० वर्षांत आपल्या सरकारने २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणलं. ही बाब अभूतपूर्व आहे हे जगाने मान्य केलं आहे. या प्रयोगाची चर्चा जगभरात होते आहे. भारताची ‘डिजिटील इंडिया मोहीम’ सगळ्या जगासाठी आदर्श ठरते आहे. गरीबांना सशक्त करण्यात या मोहिमेचा मोठा सहभाग आहे. आज प्रगतीचे नवे आलेख आपला देश ओलांडतो आहे. भारताच्या प्रगतीसाठी आता यापेक्षा मोठी संधी नाही. आपल्या देशासह आपल्या बरोबर असणाऱ्या देशांसाठीही ही मोठी संधी आहे. जी २० च्या यशानंतर जगभरात भारताचं कौतुक होतं आहे. आता आपल्याला नवी स्वप्नं बघायची आहेत. त्यासाठी आपण मार्गक्रमण सुरु केलं आहे. आज घडीला जगात भारत हा तरुणांचा देश आहे भारताचं सामर्थ्य दाखवण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आता आपल्याला मागे वळून पाहायचं नाही.*२१ व्या शतकात भारतातकडे जग आशेने पाहतं आहे*२१व्या शतकातील जग आज भारताकडे खूप आशेने पाहत आहे. वैश्विक परिदृश्याचा विचार करता पुढे जाण्यासाठी आपल्याला काही बदलही करावे लागतील. सुधारणा याबाबतचा पारंपरिक विचारही आपल्याला बदलायला हवा. भारत, सुधारणा केवळ आर्थिक बदलांपुरता मर्यादित ठेवू शकत नाही. आपल्याला जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागेल. आपल्या सुधारणा विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला अनुरूप असायला हव्यात.आपल्याला हेदेखील समजून घेतले पाहिजे की, देशासाठी सुधारणा ही कधी एकतर्फी प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून मी देशासाठी रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) दृष्टिकोन समोर ठेवला आहे. सुधारणा, ही नेतृत्वाची जबाबदारी असते. त्या आधारावर नोकरशाही कामगिरी बजावते आणि जनता जनार्दन यात जोडले जातात, तेव्हा परिवर्तन घडताना दिसू लागते.