
दोन राज्यातील विधानसभेचा आज निकाल अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला बहुमत
नवी दिल्ली*: लोकसभा निवडणुकांसोबत अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकींसाठी मतदान पार पडले होते.त्यातील आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. यात अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने आघाडी घेतली आहे.अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये ६० जागांसाठी सत्ताधारी भाजपाने १० जागांवर आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. यात मुख्यमंत्री पेमा खांडू यांचाही समावेश होता. तर आज होत असलेल्या ५० जागांवरील मतमोजणीमध्ये भाजपाने आतापर्यंत ३० जागांवर आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भाजपच्या दरबारात सध्या ४० जागा दिसत आहेत. तर नॅशनल पीपल्स पार्टी ८, राष्ट्रवादी तीन, काँग्रेस १ आणि अपक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत. अरुणाचलमध्ये बहुमताचा आकडा ३१ आहे.दुसरीकडे, सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने आघाडी घेतली आहे. विधानसभेच्या ३२ जागा असलेल्या सिक्कीममध्ये ३० जागांसाठी मतमोजणी होत असून, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने २९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाने एका जागेवर आघाडी घेतली आहे.दरम्यान, १९ एप्रिल रोजी सिक्कीममध्ये ३२ विधानसभा जागांसाठी एकाचवेळी मतदान झाले. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत झाली आहे.