
तीन किलो सोने, नऊ लाखांच्या रोकडसह सराफाचे चिपळूण येथून अपहरण ,चिपळूण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चिपळूण : इन्कम टॅक्स अधिकारी आहे असे सांगत चिपळूण शहरातील ओतारी गल्लीत सोने कारागिराच्या दुकानावर तिघांनी छापा टाकला. तीन किलो सोने, रोख रक्कम घेऊन त्या व्यापार्याचेही रविवारी रात्री अपहरण केले. मात्र, चिपळूण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तिघांनाही पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही थरारक घटना घडल्याने चिपळूण शहरात घबराट उडाली आहे.
अशरफ शेख यांच्या चिपळूण येथील ज्वेलर्समध्ये रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे कपडे घालून तिघेजण आले. इन्कम टॅक्सच्या बाबतीत आम्हाला तपासात सहकाय करा, असे त्यांनी सांगितले. बनावट ओळखपत्र दाखवल्याने त्यावर विश्वास ठेवून अशरफ शेख यांनी आपल्याकडील दागिने दाखवून वजन केले.
अल्पावधीतच या तिघांनी दागिने बॅगेत भरले. सोबत 9 लाख रुपये बॅगेत भरले. चौकशीसाठी शेख यांना ताब्यात घेतले. दिशाभूल करत वेगवेगळ्या दोन वाहनांमध्ये बसवत लवेल पर्यंत नेले. नंतर त्या तिघांनी शेख यांना माणगावमध्ये एका लक्झरीत बसविले व चिपळूणकडे पाठवले. चिपळूण पोलिसांनी नाकेबंदी केली. अखेर पुणे पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या. चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे.