खेड तालुक्यातील घाणेखुंट सरपंच राजू ठसाळे यांनी दिले सरपंचांचे मानधन दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी
खेड तालुक्यातील घाणेखुंट सरपंच राजू ठसाळे यांनी आजवर जनहितकारक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत लोकाभिमुख कारभार करण्यास सर्वाधिक पसंती दिली आहे. आतापर्यंत त्यांनी शेकडो दिव्यांगांसह विधवा व निराधार लोकांसाठी पेन्शनसह शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.यापाठोपाठच स्वतःला वर्षभर मिळणार्या मासिक सभासद भत्ता व मानधनाची ३३ हजारांची रक्कम गावातील १८ दिव्यांग लाभार्थ्यांना दैनंदिन उदरनिर्वाहासाठी सुपूर्द करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.सरपंच राजू उर्फ संतोष ठसाळे यांनी सरपंचपदाच्या खुर्चीत विराजमान होण्यापूर्वी जय भवानी मित्रमंडळ व रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून समाजकार्याला वाहून घेतले होते. दीड वर्षापूर्वी ते थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्यानी विजयाची पताका रोवल्यानंतर गावात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा व विकासकामांचा धडाकाच सुरू केला आहे. जनतेच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. प्रत्येक कुटुंबाने घर परिसरात झाडे लावण्याची मोहीम राबविली. यासाठी ग्रामस्थांना मोफत झाडे उपलब्ध करून देत झाडांचे संगोपन योग्य रितीने व्हावे याकरिता खास स्पर्धेचेही आयोजन केले होते. या उपक्रमास ग्रामस्थांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उपक्रम यशस्वी ठरला. गावातील विद्यार्थी शैक्षणिक दाखल्यांपासून वंचित राहू नये, यासाठी काही दिवसांपूर्वीच विद्यार्थी व पालकांसाठी ग्रामपंचायतीमध्येच शिबीर घेत विद्यार्थ्यांना आवश्यक ते दाखले मोफत मिळवून दिले. www.konkantoday.com