
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने ३६ तासांचा ब्लॉक
प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी ऐनवेळी घोषणा करून जम्बोब्लॉक घेण्यास विरोध केल्यानंतरही मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने ३६ तासांचा ब्लॉक घेतला आहे.शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत हा ब्लॉक असेल. यामुळे तीन दिवस प्रवाशांचे अतोनात हाल होणार असून ठाण्यातील ६३ तासांच्या ब्लॉकमुळे गैरसोयींत भर पडणार आहे.सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १० आणि ११ फलाटांची लांबी वाढविण्यासाठी इंटरलॉकिंगची कामे सुरू आहेत. ही कामे ३६ तासांत पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धिम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल. अनेक लोकल भायखळ्याऐवजी दादर, परळपर्यंत चालवण्यात येतील. शेकडो लोकल रद्द आणि अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com