सलाम मुंबई , मायबाप बालसेवा फाऊंडेशन तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनी जिल्हयात विविध प्रबोधनकारी उपक्रमांचे आयोजन जिल्हा तंबाखू मुक्तीच्या मार्गावर:विद्यार्थी , शिक्षक , अधिकारी यांचाही होणार सन्मान
रत्नागिरी : (प्रतिनिधी)जिल्हा पोलीस अधिकारी विद्यार्थी , शिक्षक सामाजिक कार्यकर्ते , विविध क्षेत्रातील अधिकारी यांच्या मदतीने तंबाखूमुक्तीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे . यासाठी सलाममुंबई आणि मायबाप बालसेवा फाऊंडेशन तर्फे विविध प्रबोधनकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण मंडळ तसेच जिल्हा माहिती कार्यालय यांचे कडून या सर्व उपक्रमांमध्ये विशेष सहकार्य केले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून सलाम मुंबई फाऊंडेशन तर सुमारे १२ वर्षांपासून मायबाप बालसेवा फाऊंडेशन जिल्ह्यात विविध ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विरोधी शपथ ,पोस्टर प्रदर्शन , व्याख्याने , पथनाटये , जम्बो आरोग्य सापशिडी , चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा आदी उपक्रम राबवित आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांनी देशपातळीवर आपले कार्य पोहचविले आहे.राष्ट्रीय बाल परिषदेमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडला असून त्यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिली. त्याचप्रमाणे तंबाखूमुक्तीचे कार्य करणाऱ्या सेवाभावी डॉक्टर्स ,पोलीस , अंगणवाडी सेविका , शिक्षक , सरपंच , सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती एमबीबीएस फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक प्रशांत जाधव यांनी दिली. दि. ३१ मे ते १५ जून या कालावधीत जिल्हयातील विविध प्रशासकीय कार्यालये , ग्रामपंचायती , नगर परिषद , विविध गावातील वाड्या – वस्त्यांवर या उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी या संदर्भात विशेष अशी नऊ पथके नऊ तालुक्यांमध्ये जाणार असल्याचे सांगितले. यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन चे संजय ठाणगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहितीसाठी व उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रशांत जाधव 7058980759 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .