वीजबिलांच्या वाढीव रकमेसह अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम रद्द करावी अन्यथा महावितरणवर धडक मोर्चा शिवसेनेचा इशारा
वीजबिलांच्या वाढीव रकमेसह अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम रद्द करावी अन्यथा महावितरणवर धडक मोर्चा काढू, असे निवेदन गुहागर तालुका शिवसेनेतर्फे महावितरणच्या गुहागर व्यवस्थापकांना देण्यात आले. गुहागर तालुक्यातील अनेक ग्राहकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत तसेच अनामत रक्कम वसूल केल्यानंतर पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने अतिरिक्त सुरक्षा रक्कमेचा अंतर्भाव महावितरणच्या बिलात केला आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे पोचली आहे. पदाधिकाऱ्यांनी तातडीने याची खातरजमा करून घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या गुहागर व्यवस्थापकांची आज भेट घेतली. वाढीव वीजबिले आणि अतिरिक्त सुरक्षा अनामतबाबत व्यवस्थापकांना निवेदन दिले. वाढीव वीजबिले कमी करावीत, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम रद्द करावी अन्यथा समस्त गुहागर तालुकावासीय वीज ग्राहकांना घेऊन कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल तसेच उग्र आंदोलन छेडण्यात येईल. या निवेदनाचा विचार करून त्वरित कार्यवाही करावी, हे निवेदन देताना शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, सचिव संतोष आग्रे, गुहागर शहरप्रमुख नीलेश मोरे,उपतालुकाप्रमुख महेश जामसूतकर, विभागप्रमुख संदीप भोसले, राकेश साखरकर यांच्यासह युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com