जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी व्हा
रत्नागिरी, : सुब्रोतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली द्वारा सन २०२४-२५ या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ६३ वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी कपफुटबॉल (सबज्युनिअर / ज्युनिअर) क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा दि.३० जुलै ते ११ सप्टेंबर २०२४ या कालावधीत असून, जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा माहे जून २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजया शिंदे यांनी केले आहे. यावर्षापासून पुढे १४ वर्ष खालील मुले ऐवजी (सबज्युनिअर) या एवजी १५ वर्ष खालील मुले व १७ वर्ष खालील मुले (ज्युनिअर) व मुली या वयोगटाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. १५ वर्षाखालील मुले (सबज्युनिअर ) – दि. १ जानेवारी २०१० रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्षाखालील मुले व मुली (ज्युनिअर) – दि. १ जानेवारी २००८ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या अंतर्गत जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा माहे जुन २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे, याची सर्व जिल्ह्यातील शाळांनी नोंद घ्यावी. तसेच जे संघ सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कपस्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व शाळांनी / संघानी सहभागापूर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे.राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी जन्मदाखला, आधारकार्ड व पासपोर्ट (सर्व मूळ प्रतीत) असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळून आल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू अधिक वयाचा नसल्याची संपूर्ण खात्री संबंधित शाळा/ विद्यालय यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी काळजीपूर्वक करावी. तरी सर्व सहभागी शाळांनी आपले संघ तयार करून ठेवावेत. वरील प्रमाणे नमूद सूचने नुसार सहभागी होणाऱ्या शाळांनी कार्यवाही करावी.