राजापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील सुरंगीच्या झाडावरील ढोलीमध्ये धनेश पक्ष्याच्या नव्या पिढीने जन्म घेतला
धनेश पक्ष्यांची विविध कारणांमुळे दिवसागणिक घटत जाणाऱ्या संख्येबाबत पक्षीप्रेमींमधून चिंता व्यक्त केली जात असताना राजापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील सुरंगीच्या झाडावरील ढोलीमध्ये धनेश पक्ष्याच्या नव्या पिढीने जन्म घेतला होता.ढोलीमध्ये (घरट्यामध्ये) मादीने अंडी घालण्यापासून पिल्लांचा जन्म होऊन ती ढोलीतून बाहेर येईपर्यंतच्या सुमारे नव्वद दिवसांच्या जन्मप्रवासानंतर धनेश पक्ष्याच्या पिल्लाने सकाळी अवकाशामध्ये झेप घेतली.शहराच्या मध्यवर्ती भागातील सुरंगीच्या झाडावरील ढोलीतील धनेश पक्ष्याच्या सलग तिसऱ्या वर्षी नवजात पिल्लाचा जन्म झाल्याने सुरंगीचे हे झाड धनेश पक्ष्याच्या जीवनप्रवासाचा एकप्रकारे साक्षीदार झाल्याची माहिती पक्षीमित्र धनंजय मराठे यांनी दिली. जन्मदाते नर आणि मादी तीच आहेत का, हे सांगणे अनिश्चित असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पुढील वर्षी धनेश पक्ष्याने या विणीच्या हंगामामध्ये या ठिकाणी वास्तव्य केल्यास निश्चितच त्याच्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवून अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com