
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शालेय जीवनापासून वर्तमानपत्र वाचन सुरु ठेवा – पोलीस उपअधीक्षक निलेश माईणकर
रत्नागिरी, दि. 6 : शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची तयारी आसावी. त्यासाठी योग्य वाचन, आकलन आणि नोंदी ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे, असे मार्गदर्शन पोलीस उपअधीक्षक निलेश माईणकर यांनी केले.
द पॉवर ऑफ मीडिया फाऊंडेशनच्यावतीने येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन कार्यक्रम करण्यात आला. पत्रकार भूषण पुरस्कार कोमल कुलकर्णी-कळंबटे यांना तसेच पत्रकार सन्मान पुरस्कार दुर्गेश आखाडे यांना देण्यात आला. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय या विषयावर श्री. माईणकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी दररोज नित्य नियमाने वर्तमानपत्राचे वाचन करावे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, देशामध्ये काय घडत आहे, काय चालले आहे हे वाचावे. योग्य नोंदी ठेवाव्यात. सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांना सामोरे जावे. अभ्यासाबरोबरच इतर कौशल्यदेखील जोपासायला हवीत. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, कोणत्याही गोष्टीत सातत्य फार महत्त्वाचे आहे. सातत्य, सराव माणसाला परिपूर्ण बनविते.
कौशल्य विकसित करते. त्यामुळे जीवनात येणाऱ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करते. त्यासाठी सराव हा हवाच. स्पर्धा परीक्षेसाठी चुकून अपयश आल्यास खचून न जाता आपल्यामधील कौशल्याच्या जोरावर नवे करिअर निर्माण करावे.
मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन संतोष गार्डी यांनी तर, आभार विनोद गावकर यांनी मानले. कार्यक्रमाला अजय बास्टे, नंदकुमार कुलकर्णी, नरेश पांचाळ, रवींद्र चव्हाण, सजिन सावंत, मेधा कोल्हटकर, सिध्देश मराठे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते.000