खेड आणि मंडणगड आगारामधून दापोलीला डिझेलची मदत एसटी वाहतूक सुरळीत – विभागीय वाहतूक अधिकारी राकेश पवार
रत्नागिरी, दि. 28 (जिमाका) : राज्य परिवहन मंडळाच्या खेड आणि मंडणगड आगारामधून दापोली आगाराला डिझेलची मदत घेण्यात आल्याने, दापोली आगाराच्या एसटी बसेसच्या फेऱ्या सुरळीत सुरु झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी राकेश पवार यांनी दिली. काल दि. 27 मे रोजी एसबीआय बँकेचा सर्व्हर डाऊन असल्याने डिझेलचे देयक अदा करता आले नाही. संध्याकाळी उशीरा त्यांचे देयक अदा झाले. त्यामुळे दापोली आगाराचा टँकर उशीरा भरला गेला. दरम्यानच्या कालावधीत खेड व मंडणगड आगारामधून डिझेलची मदत घेण्यात आली. सर्व्हर डाऊन या तांत्रिक अडचणीमुळे दापोली आगाराच्या फेऱ्या सकाळच्या सत्रात 1 तास विलंबाने धावल्या असल्या तरी, वाहतूक थांबलेली नव्हती. यापुढे आगारास लागणाऱ्या डिझेल साठ्याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले आहे.