
विषय:- समझोता घडवून आणणारे प्रभावी लोकन्यायालय
न्यायालयात कित्येक खटले दीर्घकाळ चालतात. न्यायालयात पडून असलेल्या तसेच न्यायालयात न गेलेल्या तंट्यांच्या बाबतीत लोकन्यायालय समझोता घडवून आणते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्या माध्यमातून शनिवार 22 मार्च रोजी लोकन्यायालय भरविण्यात येत आहे. कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला देण्याच्या योजनेतील लोकन्यायालय हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. लोकन्यायालय म्हणजे काय ? हे या लेखातून समजून घेवूया..
अनेक प्रकरणांमध्ये समझोता घडून न आल्याने अशी प्रकरणे न्यायालयात नव्याने दाखल होण्याची शक्यता असते. अशा गोष्टी टाळण्याचे लोकन्यायालय हे एक प्रभावी साधन आहे. न्यायालयात जाण्यापेक्षा समझोता करणे हे नेहमीच हिताचे असते.
लोकन्यायालये शक्यतो प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा, महाविद्यालये किंवा तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या न्यायालयांच्या इमारतीमध्ये भरविली जातात. रविवारी व सुटीच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत किवा सर्व तंट्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांचे कामकाज चालते.
*लोकन्यायालयासमोर येणारी प्रकरणे-*
न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे, न्यायालयात आधीच दाखल झालेली अनिर्णित प्रकरणे (कोणत्याही कायदेशीर बाबींविषयी) अशा प्रकरणात दिवाणी, फौजदारी, अपघात, कौटुंबिक, कामगार, महसूल, नगरपालिका आदी दाव्यांचा समावेश होतो. तंट्यांबाबत समझोता घडवून आणण्यासाठी तिघा मध्यस्थांचे मंडळ नियुक्त करतात. प्रत्येक मंडळाकडे 20 ते 30 प्रकरणे सोपविली जातात. दोन्ही पक्षकार या मंडळासमोर हजर होवून मंडळातील सदस्यांसोबत चर्चा होते. दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेवून मंडळ तडजोडीचा मसुदा सुचविते. थोडे बहुत देवाण-घेवाण करुन व्यवहार्य तडजोड घडवून आणली जाते. त्यावर संबंधित न्यायाधीश हुकूमनामा पास करतात. या निर्णयावर पुढे अपिल करता येत नाही.
*लोकन्यायालयाचा फायदा-*
लोकन्यायालयाचे अनेक फायदे आहेत. पक्षकारांना न्यायालयीन फी अजिबात भरावी लागत नाही. साक्षीदार बोलविणे, युक्तीवादाचे मुद्दे तयार करणे, याबाबतीत वकीलांना होणारा त्रासही वाचतो. लोकन्यायालयाने सुचविलेल्या व्यवहारी तडजोडीमुळे पक्षकारांचे समाधान होते. लोकन्यायालय हे आज अस्तित्वात असलेल्या न्यायालयास पर्याय नव्हे तर, मदतनीसच आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या परवानगीने जिल्हानिहाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संबंधित तालुका विधी सेवा समितीच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी लोकन्यायालये आयोजित करते. लोकांच्या मनात न्यायालयाविषयी विश्वास निर्माण करण्यात हे लोकन्यायालय सहाय्यभूत ठरले आहे. त्यामुळे लोकन्यायालयाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
*तडजोड कशी होते-*
ज्या न्यायालयात एखादे प्रकरण पडून आहे, त्याच न्यायालयात तडजोडीची नोंद केली जाते. न्यायालयात दाखल न झालेल्या प्रकरणांच्या बाबतीत समझोत्याचा करार केला जातो आणि त्याच्या प्रती दोन्ही पक्षकारांना देण्यात येतात. यामुळे या कराराच्या कागदपत्रांना कायदेशीर स्वरुप मिळते.
*लोकन्यायालयात कसे जाल-*
ज्यांचे वाद असतील त्यांनी प्राधिकरणाच्या अध्यक्षांना भेटून आपल्या प्रकरणाची सविस्तर माहिती देवून अर्ज करावा. त्यानंतर जेव्हा लोकन्यायालयात बोलाविले जाईल तेव्हा हजर रहावे. वकील द्यावे लागत नाहीत. लोकन्यायालये सर्वांना मोफत सेवा उपलब्ध करुन देतात. ती सर्वांसाठी खुली असून, कोणतीही फी आकारली जात नाही. उत्पन्नाचीही मर्यादा घातलेली नाही. लोकन्यायालयात सहभागी होवून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*