मांडवी किनाऱ्याची स्वच्छता मोहीम
मांडवी समुद्रकिनारी सध्या पर्यटकांची गर्दी आहे.अनेकदा प्लास्टिक कचरा, बाटल्या, खाऊचे रॅपर्स टाकल्यामुळे येथे अस्वच्छता होते. हे लक्षात घेऊन स्थानिक व्यापारी, जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी (ता. २६) सकाळी किनाऱ्याची स्वच्छता केली. जवळपास ६०० किलो कचरा गोळा केला. अनबॉक्सतर्फे आणि रत्नागिरी नगरपालिकेने हा कचरा ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे किनाऱ्याने मोकळा श्वास घेतला असून बाहेरगावाहून पर्यटकही आनंदित झाले.मांडवीतील अस्वच्छता पाहून काही नागरिकांनी सोशल मीडियावर फोटो व मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर स्थानिक व्यापारी, नागरिकांनी आपली मांडवी स्वच्छ मांडवी असे आवाहन करत रविवारी सकाळी स्वच्छतेसाठी हाक दिली. यामध्ये रत्नागिरीकरांनी चांगला सहभाग घेतला. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना अस्वच्छतेचे दर्शन घडू नये यासाठी रत्नागिरीकरांनी पुढाकार घेऊन आज सकाळी लवकर मांडवी समुद्र किनारा हजेरी लावत किनाऱ्याची साफसफाई केली. रत्नागिरीकर जागरुक नागरिक, काही पर्यटक, उद्योजक, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई, अश्विनी वाटवे, सागरी सीमा मंचचे स्वप्नील सावंत, अनबॉक्सचे प्रमुख गौरांग आगाशे व सहकाऱ्यांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला.www.konkantoday com